या भागात भविष्यात सोलार प्रकल्प उभारण्याबाबत हालचाली सुरू
गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे - अंतापूर (भेंडाळा), गणेशवाडी, सैदापूर व भेंडाळा या गावांमध्ये एमआयडीसी (औद्योगिक क्षेत्र) मंजूर झाल्याच्या चर्चांना उधाण आले असताना प्रत्यक्षात या ठिकाणी कोणतीही एमआयडीसी मंजूर झालेली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे.
गंगापूर तालुक्यातील मौजे - अंतापूर (भेंडाळा), गणेशवाडी, सैदापूर व भेंडाळा येथील एकूण ३५५.९२ हेक्टर शेती महामंडळाच्या जमिनीवर सोलार प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात औद्योगिक क्षेत्र उभारले जाणार असल्याच्या चर्चेमुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. संभाव्य रोजगारनिर्मिती व विकासाच्या अपेक्षेमुळे अनेकांनी या निर्णयाचे स्वागतही केले
होते.
मात्र, संबंधित विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या चारही गावांमध्ये एमआयडीसी मंजुरीबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे सुरू असलेल्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, या भागात भविष्यात सोलार प्रकल्प उभारण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत प्रशासन स्तरावर प्राथमिक पाहणी व अहवाल प्रक्रियाही सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
एकूणच, एमआयडीसीबाबत निर्माण झालेल्या अपेक्षा सध्या तरी अपूर्ण राहिल्या असून नागरिकांनी अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन केले आहे.












